जामनेर तालुक्यातील बोगस स्कूलबस आणि वाहन चालकांवर कारवाई होणार का?
जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापूर्वी स्कूलबस आणि व्हॅनच्या कागदपत्रांची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, विमा यासह सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी द्यावी, असे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहेत.
दरम्यान, जामनेर तालुक्यातील अनेक खाजगी शाळांच्या वाहनांबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अक्षरशः दाबून वाहतूक केली जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. काही वाहनांमध्ये सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, शाळा व्यवस्थापनाने प्रत्यक्ष वाहन तपासणी करून अपूर्ण कागदपत्रे असलेल्या वाहनधारकांना ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्यात येणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन आणि वाहनधारकांवर राहणार आहे.
तसेच सर्व परवानाधारक स्कूलबस आणि व्हॅन चालकांनी ३१ मे २०२६ पूर्वी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनकर आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले आहे. यासाठी विशेष कोट्यात अतिरिक्त अपॉईंटमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.