भडगावच्या युवा उद्योजकाला मोठी राजकीय जबाबदारी; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
भडगाव / प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भडगाव येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विकास सुरेश महाजन यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भडगाव तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विकास महाजन हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व असून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणूनही त्यांची विशेष ओळख असून, भडगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल गायत्री भोजनालयचे ते संचालक आहेत.
त्यांची सामाजिक व संघटनात्मक कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक म्हणून सुरू झाली. संघामध्ये कार्य करताना त्यांनी विविध स्तरांवरील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस म्हणूनही उल्लेखनीय काम केले. तालुका व जिल्हास्तरावर संघटन बळकटीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सामाजिक क्षेत्रातही विकास महाजन यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. माळी समाजामध्ये त्यांनी महाराष्ट्र माळी महासंघाच्या अध्यक्षपदासह जिल्हा उपाध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.