जामनेर तालुका पुन्हा हादरला
फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीविरुद्ध POCSOसह गुन्हा दाखल
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0155/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच POCSO Act कलम 8 व 12 आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवार (१८ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास राहेरा गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात ही घटना घडली. आरोपीने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे जामनेर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(पीडित अल्पवयीन असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.)
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. शाळेत जाणाऱ्या, खेळण्या-बागडण्याच्या वयातील एका निष्पाप मुलीच्या सुरक्षिततेवरच घाला घालणाऱ्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींमुळे समाजातील माणुसकीच कलंकित होत असून, अशा आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.