महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला; महिला चोरट्यांचाही सक्रिय सहभाग असल्याची चर्चा
जामनेर : शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले बसस्थानक परिसर सध्या चोरट्यांसाठी जणू सुरक्षित ठिकाण बनले आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याची चर्चा असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बसची प्रतीक्षा करत असताना नागरिकांच्या हातातील बॅग, रोख रक्कम, मोबाईल तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांकडून डल्ला मारला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, चोरीच्या घटनांमध्ये महिलांचाही सहभाग असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी नेमके कोणापासून सावध राहायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोऱ्या वाढत असताना पोलिसांची ठोस कारवाई कुठे?
बसस्थानक परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शेकडो चोरीच्या घटना घडूनही चोरट्यांवर प्रभावी कारवाई होत नसेल, तर कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे राहिला? असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
बसस्थानकासारख्या गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी नियमित पोलिस गस्त, संशयितांवर नजर, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, चोरीच्या घटनांमधील समान पद्धतीचा तपास आणि सक्रिय चोरट्यांच्या टोळ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. मात्र, चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अशा उपाययोजनांना वेग येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्यासमोर मोठे आव्हान
जामनेर पोलीस ठाण्याचा कारभार आता नवनियुक्त निवृत्ती बोऱ्हाडे यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांना लगाम घालण्याची जबाबदारी आता त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस यंत्रणेवर आली आहे.
बसस्थानक परिसरातील चोरट्यांचा बंदोबस्त करणे, चोरीच्या प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना जेरबंद करणे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा उभी करणे, हे नव्या पोलीस नेतृत्वासमोरील पहिले मोठे आव्हान ठरणार आहे.
जामनेरकरांचा सवाल स्पष्ट आहे—बसस्थानकातील चोऱ्यांना आता लगाम लागणार तरी कधी? चोरट्यांवर पोलिसांचा धाक निर्माण होणार तरी कधी?
निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिस या आव्हानाला कसे सामोरे जातात आणि बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर कितपत प्रभावी नियंत्रण मिळवतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.