सामरोदमध्ये अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध धंद्यांविरोधात नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कारवायांना वेग
जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सामरोद गावातील अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सामरोद परिसरात सर्रासपणे दारू विक्री व अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सामरोद शिवारात कारवाई केली. शामराव बळीराम पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात झाडाझुडपांमध्ये पोलिसांना अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.
यावेळी गजानन गंगाराम कोळी (वय २९, रा. सामरोद, ता. जामनेर) हा व्यक्ती पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून ४०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच २० लिटर तयार गावठी दारू, असा एकूण अंदाजे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी पदभार स्वीकारताच शहरासोबतच आता ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवरही लक्ष केंद्रित केल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैध दारू विक्री, गावठी दारू निर्मिती आणि इतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळातही अशाच प्रकारे कारवायांमध्ये सातत्य राहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.