कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली; दोंदवाडे गावावर शोककळा
जामनेर, दि. 18 जून – कर्जबाजारीपणाला कंटाळून दोंदवाडे (ता. जामनेर) येथील 36 वर्षीय तरुण शेतकरी जयसिंग शिवलाल डोभाळ (राजपूत) यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून डोभाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. याशिवाय शेतातील विहिरीचेही मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता; मात्र आजपर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था, शेंदुर्णी यांच्याकडून सुमारे 4 लाख 39 हजार 704 रुपयांच्या कर्जवसुलीसाठी वारंवार नोटिसा व फोन येत असल्याने त्यांची मानसिक स्थिती खालावली होती. वाढते कर्ज, शेतीचे नुकसान आणि आर्थिक विवंचना यामुळे ते नैराश्यात गेले होते. याच मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईक व गावकऱ्यांनी सांगितले.
जयसिंग डोभाळ यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबाचा आधारवड हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, पहूर येथे पाठविण्यात आला आहे.
एका तरुण शेतकऱ्याचे असे अकाली जाणे हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक संकटाचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारी घटना ठरली आहे.