जामनेर, प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी येथील पहूर रोडवरील एका धाब्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात 108 रुग्णवाहिका सेवेचा चालक संजय विश्राम सुरवाडे याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील सुरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 118(1) व 352 अन्वये एफआयआर क्रमांक 0297/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जामनेर पोलीस करीत आहेत.
तक्रारीनुसार, 16 जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टाकळी येथील धाब्यावर काही व्यक्ती एकत्र बसल्या असताना वाद निर्माण झाला. या वादातून आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आरोपी 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेवरील चालक असल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. घटना घडली त्यावेळी संबंधित चालक ड्युटीवर होता का, पार्टी करणारे इतर व्यक्ती देखील ड्युटीवर होते का? त्याच्या हालचालींची नोंद नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध आहे का, तसेच सेवा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पुढील चौकशीत या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
ऑन ड्युटी पार्टीचे आयोजन कोणाचे?
जामनेर उपविभागीय रुग्णालयातील एका डॉक्टरांनी ही पार्टी दिल्याची प्राथमिक माहिती आहे या पार्टीमध्ये रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक यांना निमंत्रित केले गेले होते. रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि इतर स्टाफ हा कामाच्या वेळात पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते का? तसेच ऑन ड्युटी असणाऱ्या अधिकारी आणि इतर स्टाफ वर आता पुढील कार्यवाही काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.