फत्तेपूर गँगरेप प्रकरणात मोठी कारवाई; १५ पैकी १४ आरोपी जेरबंद, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची धडक मोहीम
फत्तेपूर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत २ जून २०२६ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव-कापूसवाडी रोडवरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात ४० वर्षीय पीडित महिला तिच्या परिचयातील रोषण गुलशेर तडवी यांच्यासोबत बसलेली असताना १५ जणांचा एक गट तेथे आला. त्यांनी दोघांना धमकावून युसूफ नामदार तडवी व अशपाक इमाम तडवी यांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
या अमानुष प्रकारादरम्यान काही सहआरोपींनी मोबाईलवर संपूर्ण घटना चित्रित केली. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी आतापर्यंत १५ पैकी १४ मुख्य व सहआरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.