कळमसरा व कुभांरखान जि.प. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
कळमसरा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने कळमसरा व कुभांरखान येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची शाळांमध्ये संजय आप्पा चौधरी व मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन खोडपे उपस्थित होते. यावेळी संजय आप्पा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात मोठे साधन असल्याचे सांगितले. तसेच, शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच भविष्यात शाळेला किंवा विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी आपण कायम सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला रामभाऊ ग्यान, प्रल्हाद वाघ, अमोल थोरात, गजानन थोरात, गजानन डामरे, समाधान चौधरी, शांताराम चौधरी, समाधान पाटील, राजू भदाणे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उपस्थितांनी व्यक्त केलेल्या समाधानामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.