जामनेरमध्ये मंडळाच्या हिशोबावरून वाद; तरुणावर चाकूने वार केल्याचा आरोप
आईच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध जामनेर पोलिसांत फिर्याद
जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात मंडळाच्या मागील वर्षाच्या हिशोबावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, किशोर सुरेश बाविस्कर याचा निलेश प्रभाकर नानोटे व त्याचा भाऊ योगेश प्रभाकर नानोटे यांच्यासोबत मागील वर्षाच्या मंडळाच्या हिशोबावरून वाद सुरू होता. २ सप्टेंबर रोजी दुर्गा देवीच्या मूर्तीच्या बुकिंगवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यानंतर सायंकाळी या वादाला पुन्हा तोंड फुटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, निलेश नानोटे याने किशोरला मागील वर्षाच्या मंडळाच्या पैशांवरून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर कमरेला असलेल्या चाकूने किशोरच्या पोटावर दोन वेळा वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किशोर गंभीर जखमी झाला.
किशोरवर हल्ला होत असताना शेजारी राहणारे आदित्य प्रविण सुरवाडे व भैय्या सिताराम खाटीक यांनी त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी केली. यावेळी निलेशने त्यांच्यावरही चाकूने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वारांमध्ये दोघांच्या हाताला दुखापत झाल्याचे नमूद आहे.
दरम्यान, योगेश प्रभाकर नानोटे यानेही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या झटापटीत दगडफेक झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
जखमी किशोरला सुरुवातीला श्री साई हॉस्पिटल, जामनेर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटल, जळगाव येथे हलविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी किशोरची आई सुनीता सुरेश माळी (वय ५०, रा. इंदिरा आवास, जामनेर) यांनी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, निलेश प्रभाकर नानोटे (वय ३५) व योगेश प्रभाकर नानोटे (वय ३८) यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.