जामनेर तालुक्यात १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात
जामनेर : जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, मोहाडी येथील एका ४३ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता मोहाडी गावातील संबंधित महिलेच्या घरात ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने घरात झोपलेल्या १२ वर्षीय मुलीशी गैरवर्तन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्यावर दबाव आणल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४००/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ व ६५ तसेच POCSO कायदा २०१२ मधील कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जामनेर पोलिसांनी आरोपी भास्कर भिल याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल रामनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अल्पवयीन पीडित मुलीची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करण्यात येत आहे.