टाकळी खुर्द येथे शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात
सत्यशोधक प्रवेशद्वार उभारण्याची मागणी; वैचारिक व्याख्यानातून समतावादी विचारांचा जागर
जामनेर प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिरासमोर तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुसरा शिवराज्याभिषेक दिन अर्थात शाक्त राज्याभिषेक दिन आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमा पूजनासह वैचारिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भातील मागणी फलकाचे अनावरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे सचिव रमेश दादा वराडे व बाळू चवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रा. आकाश बिवाल, गणेश महाजन, अतिक नबी पिंजारी, धनराज चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संजय दुधे यांनी महापुरुषांच्या जयघोषाने वातावरणात उत्साह निर्माण केला. यावेळी टाकळी खुर्द गावाच्या वतीने मान्यवरांचे ‘सार्वजनिक सत्यधर्म’ तसेच गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
सत्यशोधक रमेश दादा वराडे यांच्या संकल्पनेतून सत्यशोधक प्रवेशद्वाराच्या मागणीचा फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात आला. यावेळी प्रवेशद्वार उभारण्याबाबतचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. लवकरच टाकळी खुर्द गावात दिमाखदार सत्यशोधक प्रवेशद्वार उभे राहील, अशी अपेक्षा पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी वामनदादा कर्डक यांचे ‘स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले’ हे गीत सादर करून व्याख्यानाला सुरुवात केली. २४ सप्टेंबरचा शाक्त राज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. “शिवराय–फुले–शाहू–आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत. महापुरुषांना डोक्यावर नाही, तर डोक्यात घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हीच आपली मूल्ये असली पाहिजेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच महात्मा फुले हे शिवजयंतीच्या सार्वजनिक आयोजनाच्या इतिहासातील महत्त्वाचे प्रवर्तक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी गावकऱ्यांना अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचारांची कास धरण्याचे आवाहन केले. सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड व गंधमुक्तीचे कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. “सर्व साक्षी जगत्पती, त्याला नकोच मध्यस्ती” हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगत भयमुक्त आणि शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक विचार स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच जितू अहिरे, माजी सरपंच समाधान वराडे, मंगलदास अहिरे, सारंगधर अहिरे, बाळू चवरे माळी, पवन माळी, छायाचित्रकार प्रवीण गावंडे यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, माळी महासंघ, एकता तरुण मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, रॉयल किंग ग्रुप, राजमाता व सावित्रीबाई फुले महिला बचत गट आणि सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला, पुरुष व तरुण कार्यकर्त्यांसह टाकळी खुर्द येथील शेकडो नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक कैलास महाजन यांनी केले, तर आभार रमेश दादा वराडे यांनी मानले.