जामनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय गौरव! डॉ. अंशुमान मिश्रा श्रीलंकेत ‘मुख्य वक्ते’
जामनेर : जामनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. येथील जी. डी. महाजन कला, श्री. के. आर. नवलखा वाणिज्य आणि म. शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अंशुमान मिश्रा यांना श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘मुख्य वक्ते’ अर्थात Keynote Speaker म्हणून आमंत्रित करण्यात आले.
सबरगमुवा विद्यापीठ, श्रीलंका आणि उत्तर प्रदेशातील स्व. मधु नारायण मिश्रा शोध केंद्र, बस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. मुन्शी प्रेमचंद आणि श्रीलंकेचे जागतिक साहित्यिक मार्टिन विक्रमसिंघे यांच्या साहित्याचा अनुबंध हा या परिषदेचा प्रमुख विषय होता.
या परिषदेत डॉ. अंशुमान मिश्रा यांनी दोन्ही महान साहित्यिकांच्या साहित्याचा जागतिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण वेध घेतला. देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत त्यांनी आपले विचार मांडले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत श्रीलंकेच्या कॅलेनिया विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू प्रा. लक्ष्मण सेनिविरत्न, प्रा. रोहन अभय विक्रम, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जयंत कुमार शर्मा यांच्यासह भारत आणि श्रीलंकेतील अनेक नामांकित शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक सहभागी झाले होते.
परिषदेचे आयोजन व सूत्रसंचालन बस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकेश मिश्रा यांनी केले.
डॉ. अंशुमान मिश्रा यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे जामनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या या यशाबद्दल जामनेर तालुक्यातील शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.