सारबेटे येथे आरपीआय (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
२०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; संघटन विस्ताराला नवे बळ
अमळनेर प्रतिनिधी अमोल पाटील: अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शाखा उद्घाटन व पक्षप्रवेश मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून आरपीआय (आ) ची संघटनात्मक ताकद वाढवली.
कार्यक्रमास आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे तसेच तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत नेरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले.
मेळाव्यात पक्षाच्या नव्या शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अल्पसंख्याक आघाडी प्रमुखपदी जुबेरभाई खान मेहमूद खान मेवाती, शाखाध्यक्षपदी मुबश्शीर खान गुलाम रसूल खान मेवाती, उपाध्यक्षपदी अफरोज खान जमील खान मेवाती, कार्याध्यक्षपदी शाबिर खान इस्माईल खान मेवाती, सचिवपदी जुबेर खान उमर खान मेवाती, सरचिटणीसपदी मुस्तकीम शाह, चिटणीसपदी गुलाम रसूल हशीर खान मेवाती, खजिनदारपदी वकील खान रौफ खान मेवाती तसेच सहसचिवपदी फारुख खान नशीब खान मेवाती यांची निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. गरीब, वंचित व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करण्यावर भर दिला. तर धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ यांनी युवकांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांनी सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी संघटित राहून कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. “एकजुटीच्या बळावर समाजातील प्रत्येक प्रश्न सोडवता येतो,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुमारे २०० कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.