30 जूनपूर्वी ऑनलाइन हयात दाखला सादर करा; अन्यथा अनुदान बंद होण्याची शक्यता
जामनेर | प्रतिनिधी
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, श्रावणबाळ तसेच संजय गांधी योजनेतील विधवा, दिव्यांग आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र (हयात दाखला) सादर करणे शासनाच्या आदेशानुसार बंधनकारक करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपल्या जवळच्या सेतू किंवा ऑनलाइन सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाइन हयात दाखला काढावा. काढलेल्या हयात दाखल्याची एक प्रत स्वतःकडे ठेवावी तसेच दुसरी प्रत संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करावी.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीत ऑनलाइन हयात दाखला सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे संजय गांधी व इतर संबंधित योजनांतील अनुदान थांबविले जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ बंद होऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी तत्काळ हयात दाखला काढून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जामनेर तहसील प्रशासनाने केले आहे.