राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा १५ जूनपासून; शिवभक्तांना सहभागाचे आवाहन
जामनेर प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी १५ ते १७ जून २०२६ या कालावधीत “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून, किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि शिवकार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार आणि स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक व ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, युवक, महिला तसेच सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यात्रेचे समन्वयक राहुल चव्हाण आणि कैलास पाटील यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याला अभिवादन करत स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यातील शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.