समाजसेवेचा नवा अध्याय : वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जामनेर, दि. ७: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने संत गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर येथे साक्षात वानर हनुमान वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प.पू. शामचैतन्य बापू, अध्यक्षस्थानी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, तर प्रमुख वक्ते म्हणून निलेश चव्हाण सर उपस्थित होते. याशिवाय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त गजानन मंडवे सर, नगरसेवक बाबुराव हिवराळे, ब्रह्मकुमारी आश्रमच्या सुषमा दीदी व प्रतिष्ठानचे सदस्य विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख वक्ते निलेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत, इतिहास हा ताठ मानेने जगणाऱ्यांचा लिहिला जातो, असे प्रतिपादन केले. प.पू. शामचैतन्य बापू यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी शिवचरित्र आत्मसात करण्याचे आवाहन केले.
गजानन मंडवे सर यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी वाचनालयासाठी विविध मान्यवर व दात्यांनी मदतीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय, तोंडापूर यांच्या वतीने ११ हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली. नगरसेवक बाबुराव हिवराळे यांनीही ११ हजार रुपयांची देणगी जाहीर करून प्रदान केली. तसेच काही दात्यांनी वर्षभरासाठी वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माळी यांनी केले. नाना सातवे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली, तर जितू कुमावत यांनी आभार मानले. राहुल चव्हाण यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांचा लेखाजोखा, खर्चाचा तपशील आणि आगामी योजनांची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमास जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, दीपक पवार, ईश्वर चवरे, प्रशांत भोई, जयवंत पर्वते, सोपान लोहार, भोला निकम, डॉ. पंकज माळी, अमोल इंगळे, अक्षय पवार, रामेश्वर पाटील, ईश्वर चौधरी, शंकर सातवे, भरत ठाकरे, विजय शिवदे, सुदर्शन वराडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रुग्णवाहिका सेवा व आरोग्यविषयक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल रेड स्वस्तिक सोसायटीचे आयोजकांतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला.