जामनेरमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ; नगराध्यक्षा साधना महाजन यांचे पालकांना आवाहन
जामनेर | प्रतिनिधी
संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सहभाग घेत मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, “प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षणासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक पालकाने जागरूक राहून या जनहिताच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.”
पोलिओमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.