तरसोद–फागणे बायपासच्या निकृष्ट कामावर मनसे-ठाकरे सेना आक्रमक; उच्चस्तरीय चौकशी व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी
जळगाव : तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करावे, तसेच दोषी अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तरसोद ते फागणे बायपास हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर अवजड आणि प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गावर लोहमार्ग क्रॉसिंग असल्याने रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करण्यात आला असून तांत्रिक निकष, गुणवत्तेची मानके आणि करारातील अटींचे पालन करण्यात आले नसल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे.
निकृष्ट कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. भविष्यात या मार्गावर अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी, रस्त्याच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करावी आणि काम निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला शासनाच्या सर्व निविदा प्रक्रियेतून अपात्र ठरवून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय या कामाची देखरेख करणाऱ्या अभियंते, अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याबरोबरच सक्षम न्यायालय आणि संबंधित वैधानिक प्राधिकरणांकडे दाद मागितली जाईल, असा इशाराही मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, उपतालुकाध्यक्ष शैलेश चौधरी, राहुल चव्हाण, सुनील सोनवणे, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, चेतन पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, प्रमोद सोनवणे, गणेश पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, लोटन सोनवणे, राजेंद्र पाटील यांच्यासह मनसे व ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.