जामनेर महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त ‘सद्भावना शपथ’
जामनेर (प्रतिनिधी) : येथील गी. द. महाजन कला, श्री के. रा. नवलखा वाणिज्य आणि म. शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांची जयंती आणि ‘सद्भावना दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जोपासण्याची सद्भावना शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. खडायते यांच्या हस्ते स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भीमराव शिरसाठ यांनी केले. त्यांनी राजीव गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना भारताला आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीची दिशा देण्यात त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच युवकांना आधुनिक विचारांची प्रेरणा देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
यानंतर प्रा. विजय भोई यांनी उपस्थितांना ‘सद्भावना शपथ’ दिली. जाती, पंथ, प्रदेश अथवा भाषेच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता देशातील नागरिकांमध्ये भावनिक ऐक्य, बंधुभाव आणि सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी सामूहिकरित्या केला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डी. एस. पाटील, डॉ. ए. व्ही. मिश्र, डॉ. विजेंद्र पाटील, प्रा. भालचंद्र पाटील, डॉ. आर. यू. जाधव, डॉ. अक्षय घोरपडे, प्रा. मनोज चौधरी, डॉ. मनीषा चौधरी, डॉ. उज्ज्वला गावित, प्रो. कोमल चुघ, डॉ. नवघरे, डॉ. लोहार, डॉ. वाघ, प्रा. एस. बी. इंगळे, प्रा. जितेंद्र पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी तसेच कार्यालयीन अधीक्षक प्रवीण पदमे आणि कर्मचारी उपस्थित होते.