जामनेरमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप; ‘खिलौना बँक’चा शुभारंभ
जामनेर4 : स्वातंत्र्यदिन तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमादरम्यान गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘खिलौना बँक’चा शुभारंभही करण्यात आला.
‘खिलौना बँक’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये बॅट-बॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, दोरीउडी, लगोरी, रिंग आदी खेळांचे साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच मैदानी व बौद्धिक खेळांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी संघटनेची स्थापना केली. स्थापनेपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पवन चोरडिया परिवाराचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले. कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, शहर उपाध्यक्ष अभिनंदन जैन, सदस्य विकास ललवानी, महिला अध्यक्ष मोना चोरडिया, राखी लोढा, शीतल चोरडिया यांच्यासह शाळेच्या निर्मला महाजन, अरुण बावस्कर आणि रोहिदास राठोड यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक साहित्य वाटप आणि ‘खिलौना बँक’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.