ज्ञानगंगा विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांचा गुणगौरव
जामनेर : जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत बोंडे, श्री. के. बी. माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, प्राचार्य श्री. राजेंद्र सोनवणे यांच्यासह आर.बी.एस.के. टीममधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आयुर्वेद, निरोगी जीवनशैली आणि आरोग्यविषयक विषयांवर केलेल्या लेखन व वक्तृत्वातून आपली गुणवत्ता सादर केली.
यावेळी उत्कृष्ट निबंध लेखन व वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास पाटील यांनी केले, तर आभार श्री. विजय कोळी यांनी मानले.