हिंदीच्या वैशिष्ट्यांपासून जागतिक प्रसारापर्यंत; शैलेंद्र महाविद्यालयात ‘हिंदी पखवाडा’ उत्साहात
दहिसर (मुंबई) : दहिसर पूर्व येथील शैलेंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने ‘हिंदी पखवाडा’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हिंदी भाषेचे महत्त्व, तिची वैशिष्ट्ये आणि जागतिक स्तरावर वाढता प्रसार यावर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून एच. आर. पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर येथील सेवामुक्त प्राध्यापिका डॉ. सुनीती आचार्य उपस्थित होत्या. तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जामनेर येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. अंशुमान मिश्र यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कांचन आणि प्राध्यापिका भावना यांनी अतिथींचे स्वागत केले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे केले.
परदेशातही हिंदीचा वाढता प्रसार
प्रमुख वक्त्या डॉ. सुनीती आचार्य यांनी हिंदी भाषेच्या विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत परदेशात हिंदीचे होणारे अध्ययन-अध्यापन आणि वाढता प्रसार याविषयी माहिती दिली. हिंदी ही केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवर तिचा विस्तार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. अंशुमान मिश्र यांनी आपल्या खास शैलीत काव्यरूपातून हिंदी भाषेचे गुणगान करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती पितळे यांचे मार्गदर्शन लाभले. हिंदी विभागप्रमुख डॉ. सुकीर्ती शर्मा, पूजा मिश्रा आणि आदित्य यांनी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.