दुष्काळ जाहीर, तरीही पाणबुड्यांचा उपसा सुरूच!
सोनारी परिसरात विहिरी व तलावातील पाणी शेतीसाठी वापरल्याचा आरोप; पाणबुड्या हटविण्याची ग्रामस्थांची मागणी
जामनेर (प्रतिनिधी : अमोल खरात) : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन प्रशासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला असतानाही तालुक्यातील सोनारी परिसरात विहिरी आणि तलावांमधून शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील विविध विहिरींमध्ये सुमारे १० ते ११ पाणबुड्या बसविण्यात आल्या असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी शेतीसाठी उपसले जात आहे. विशेष म्हणजे तलावातील पाणीसाठाही कमी होत असताना तेथूनही पाणबुड्यांच्या माध्यमातून पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा भविष्यासाठी जपणे आवश्यक असताना मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू राहिल्यास उन्हाळ्यात गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना जाहीर नोटिसा देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, नोटिसा देऊनही संबंधित पाणबुड्या अद्याप हटविण्यात आलेल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोटिसांनंतरही प्रत्यक्ष कारवाई का होत नाही? प्रशासनाकडून दखल का घेतली जात नाही? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू राहिल्यास भविष्यात गावकऱ्यांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संबंधित पाणबुड्या तातडीने हटवून अनावश्यक पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आता ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासन या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे सोनारीकरांचे लक्ष लागले आहे.