जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २० हजार चार्जिंग फवारणी पंपांचे होणार वाटप; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सेवाभावी उपक्रम
अर्ज भरण्यास सुरुवात
जामनेर : शेतकरी बांधवांचा वेळ, मेहनत आणि फवारणीचा खर्च कमी व्हावा, तसेच आधुनिक साधनांचा वापर करून शेती अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल २० हजार चार्जिंग फवारणी पंपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून गिरीश महाजन फाउंडेशन (जीएम फाउंडेशन), जळगाव आणि लक्ष्य फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. फवारणीसाठी लागणारा वेळ व श्रम कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक साधन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. जामनेर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे फवारणीच्या कामात मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, शेतीतील खर्च आणि श्रम कमी करण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोशन मराठे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर अहिरे, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, जिल्हा सरचिटणीस आतिश झाल्टे, मंडळाध्यक्ष रवींद्र झाल्टे, कमलाकर पाटील, दीपक तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पाटील, तुकाराम आप्पा निकम यांच्यासह नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.