पुण्यात अशोक शिंदे यांना “शंभू शौर्य पुरस्कार” प्रदान
पुणे : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तसेच रेड स्वस्तिक सोसायटीचे महासचिव श्री. अशोक शेषराव शिंदे यांना प्रतिष्ठेचा “शंभू शौर्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
शंभूराज्याभिषेक ट्रस्ट पुणे, वी आर टुगेदर सेवाभावी संस्था आणि महाराष्ट्र विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजहिताच्या विविध आंदोलनांमधून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, महिलांच्या सन्मानासाठी लढा उभारणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच देशभरातील गरजूंना आरोग्य सेवा पुरविणे या कार्याची दखल घेत अशोक शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
हृदयरोग, कर्करोग, मेंदू व मणक्यांच्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस सेंटर तसेच कुंभमेळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा प्रकल्प राबविण्यात त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
या सन्मान सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, रामदास फुटाणे, ज्योतीताई मेटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हजारो शंभूभक्तांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.