*जिल्हाधिकारी रोहान घुगे यांचे आवाहन *
जळगाव/प्रतिनिधी (दि.२१ मे २०२६):- जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्यात महत्वाची भूमिका वाजवतात.त्यामुळे शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आढावा बैठक गुरुवार दि.२१ मे रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या निपुण भारत अभियानाच्या अमलबजावणी बाबत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणाची पहिली पायरी ही जिल्हा परिषदेच्या शाळांपासूनच सुरु होते. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन पिढी घडविणारे मंदिर आहे म्हणून येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात पटसंख्या वाढविणाऱ्या शाळांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात येणार आहे. व त्या सोबतच जिल्हा स्तरावर अशा शाळांचा विशेष गौरव देखील केला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढ व गुणवत्ता वाढीकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन मेहनत घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील एकही शाळा निपुण झाल्याशिवाय राहता कामा नये त्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांची निपुण क्षमता वाढविण्यासाठी विशेष भर देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फक्त पुस्तकी अभ्यास शिकविला न जाता विद्यार्थ्यांचे अवांतर ज्ञान विकसित होण्याच्या दृष्टीने शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी धोरण निश्चित करून आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक महिन्याला निपुण बाबत आढावा बैठक जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर घेण्यात यावी. व त्या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. यापुढच्या काळात तालुका स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठका घेण्यात येणार असून या बैठकीत निपुण बाबत आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला जिल्ह्यातील केंद्रप्रमुख व सर्व गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.