भाजपचे प्रशिक्षण महाअभियान; कार्यकर्त्यांना विचारधारेचे धडे की रिसॉर्टमध्ये उन्हाळी सैरसपाटा
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला कार्यकर्त्यांकडून हरताळ!
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील एका भव्य दिव्य रिपोर्टवर भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्हाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास आणि जनसेवेचे धडे देण्यासाठी आयोजित या प्रशिक्षण वर्गात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

या प्रशिक्षण वर्गात नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. भाजपमध्ये प्रशिक्षित कार्यकर्त्यालाच संघटनेची खरी ताकद मानले जाते. विचार, शिस्त, सेवा आणि राष्ट्रहिताची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी अशा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अनुप अग्रवाल, आमदार अमोल जावळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मात्र, या प्रशिक्षण महाअभियानावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आले आहे. वाघूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील भव्य रिसॉर्टमध्ये हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “हे खरोखर प्रशिक्षण शिबिर होते की कार्यकर्त्यांसाठी सैरसपाटा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशिक्षणासोबतच उन्हाळी पर्यटनाचा आनंद मिळावा या हेतूनेच या ठिकाणाची निवड करण्यात आली का? अशीही चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केलेले असताना, दुसरीकडे कार्यकर्त्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून तब्बल २० ते 40 किलोमीटरचा प्रवास करत रिसॉर्टमध्ये हजेरी लावणे म्हणजे पंतप्रधानांच्या संदेशालाच हरताळ फासण्याचा प्रकार नाही का? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
कमी खर्चात साध्या ठिकाणीही असे प्रशिक्षण होऊ शकले असते, मात्र आलिशान रिसॉर्टची निवड का करण्यात आली, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांनी नेमके काय आत्मसात केले आणि त्याचा परिणाम त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यातून कितपत दिसून येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कमी खर्चात साध्या ठिकाणीही असे प्रशिक्षण होऊ शकत नाहीत का? अशा आलिशान रिसॉर्टची निवड का करण्यात आली, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे.