सोनारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत चोरी; वर्गांचे कुलूप फोडून साहित्याची उलथापालथ!
(प्रतिनिधी | अमोल खरात)
जामनेर: तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शाळेतील काही वर्गखोल्यांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत साहित्याची उलथापालथ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शाळेच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर काही वर्गखोल्यांचे कुलूप तोडून वर्गांमधील साहित्य अस्ताव्यस्त केले. या चोरीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू किंवा साहित्याची चोरी झाली आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पंचनामा आणि तपासानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.
दरम्यान, सकाळी ग्रामस्थ शाळेच्या परिसरात असताना त्यांना संशयास्पद परिस्थिती आढळून आली. त्यांनी तत्काळ शाळेतील संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाहणी केली असता वर्गखोल्यांचे तुटलेले कुलूप आणि अस्ताव्यस्त पडलेले साहित्य दिसून आले. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक संस्थांमध्येही चोरट्यांचा वावर वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
चोरीमागील नेमका हेतू काय होता आणि चोरट्यांनी कोणत्या वस्तू लंपास केल्या, याचा उलगडा पोलिस तपासानंतर होणार आहे.