ग्रामपंचायतीतील विविध गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण सुर
जामनेर | प्रतिनिधी : अमोल खरात
तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित गैरव्यवहार, विकासकामांमधील अनियमितता आणि ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थ अमोल भास्कर सुरवाडे यांनी पंचायत समिती गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर ग्रामपंचायतीच्या विविध कामांबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. रोजगार हमी योजनेतील मजुरी खर्च, माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत आढळलेल्या कथित तफावती, गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण, सौर पॅनल व बॅटरी चोरी प्रकरण तसेच विविध विकासकामांवरील खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय गावातील रस्ते, स्ट्रीट लाईट, स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण, सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही उपोषणकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उपोषणकर्ते अमोल सुरवाडे यांच्या म्हणण्यानुसार, माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमधून अनेक बाबी समोर आल्या असून त्याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या करातून आणि शासन निधीतून झालेल्या विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडण्यात यावा, अशीही त्यांची मागणी आहे.
दरम्यान, उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र संबंधित विभागाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागतात का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.