“सावधान शेतकरीहो! जामनेरमध्ये बोगस HTBT बियाण्यांचा सापळा; लाखोंचा साठा जप्त
Diya-59 आणि Krish-45 नावाने विक्रीचा डाव उधळला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल साठा जप्त; चौघांविरुद्ध गुन्हा
जामनेर | प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी घटना जामनेरमध्ये उघडकीस आली आहे. जामनेर शहरातील एका घरगुती गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी ९ लाख १५ हजार ४१६ रुपये किमतीचे बेकायदेशीर HTBT कापूस बियाणे जप्त केले असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव पोलीस दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जामनेर शहरातील साईनगर परिसरात प्रतिबंधित HTBT बियाण्यांचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ५ जून रोजी छापा टाकला.
या कारवाईत “Diya-59” (KDCHH 02 BG II) आणि “Krish-45” (KDCHH 065 BG II) या नावाचे एकूण १०७ पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत ९ लाख १५ हजार ४१६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान ही बियाणे गुजरात राज्यातून आणून जामनेर परिसरात विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दीपक राजाराम चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुंजन आत्माराम पाटील (रा. वडाळी), भूषण पाटील (रा. वडाळी) आणि बबनराव काळे (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
खरीप पेरणीपूर्वी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. पावती घेणे, बियाण्यावरील टॅग व कंपनीची माहिती तपासणे तसेच संशयास्पदरीत्या स्वस्त दरात मिळणाऱ्या बियाण्यांपासून दूर राहणे आवश्यक आहे. बोगस किंवा अनधिकृत बियाण्यांमुळे उगवण क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
दरम्यान, जिल्हा पोलिसांनी बेकायदेशीर व प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्रीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी अशा प्रकारांची माहिती तत्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.