अमळनेरमध्ये एटीएममध्ये ‘नो कॅश’; शेतकऱ्यांची उन्हात हेलपाटे

अमळनेर : शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असताना बियाणे, खत, औषधे आणि इतर आवश्यक खर्चासाठी रोख पैशांची गरज वाढली आहे. मात्र अनेक एटीएममध्ये वारंवार “No Cash” ची स्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दुपारच्या कडक उन्हात अनेक शेतकरी एटीएमसमोर रांगा लावत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. मात्र तासन्तास प्रतीक्षा करूनही पैसे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एका एटीएममध्ये पैसे नसल्याने दुसऱ्या एटीएमकडे धाव घ्यावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरी यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. एटीएममध्ये नियमितपणे रोख रक्कम उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आता प्रशासन आणि संबंधित बँकांकडे जोर धरू लागली आहे.