जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील बोदवद रोड परिसरात आज सकाळी अवैधरित्या घरगुती गॅस वाहनात भरण्याच्या ठिकाणी भीषण स्फोटाची घटना घडली. यात एक मारुती ओमनी गाडी जळून खाक झाली असून एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगावला जात असलेली मंडळी रेवती येथून जामनेरमार्गे प्रवास करत होती. बोदवद रस्त्यावर गाडीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाला. त्यानंतर जवळ ठेवलेल्या अनेक सिलेंडरनाही आग लागली. अपघाताच्या वेळी गाडीत बसलेले महिला-पुरुष सुदैवाने बाहेर असल्याने मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. मात्र, या घटनेत एक जण भाजून गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा सर्रास काळाबाजार सुरू असून खुलेआम वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्याचा व्यवसाय फोफावत आहे.बोदवड रोड, पाचोरा रोड, भुसावळ रोड, येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस भरला जात आहे. यासंदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही पोलिस प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरू असल्याचा आरोप जनसामान्यातून केला जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे.
+ There are no comments
Add yours