उद्योजकांसाठी मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि व्यवसाय विकासावर भर
जामनेर (प्रतिनिधी):
खानदेशातील उद्योजकांना बळकटी देण्यासाठी भारतीय जैन संघटना संचलित बीजेएस सक्षमच्या माध्यमातून 12 एप्रिल रोजी जामनेर येथे MSME (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) आणि उदयोन्मुख स्टार्टअप्ससाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती संघटनेचे खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी दिली.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश उद्योजकांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणे, तसेच व्यवसाय उभारणी व वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करणे हा आहे. सहभागीांना स्टार्टअप आणि MSME क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बाबी सोप्या व व्यवहार्य भाषेत समजावून सांगितल्या जाणार आहेत. यामध्ये नोंदणी प्रक्रिया, सरकारी सहाय्य, तसेच व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि कौशल्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यशाळेला बीजेएसचे MSME नॅशनल प्रोग्राम हेड निरंजन जुवा (जैन) (अहमदाबाद) मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या दशकभराच्या अनुभवाच्या आधारे ते उपस्थितांना प्रशिक्षण देतील. संवादात्मक सत्राद्वारे सहभागींच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता जामनेर येथील नया महावीर भवन, गुरु गणेश नगर, पाचोरा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उपाध्यक्ष विनय पारख व खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
उत्पादक व सेवाक्षेत्रातील उद्योग, नवउद्योजक, महिला व्यवसायी, बेरोजगार युवक, गृहिणी, तसेच इंजिनिअरिंग व MBAच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अशा विविध घटकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे खानदेशातील उद्योजकांना नवी दिशा मिळून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी स्थानिक पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
+ There are no comments
Add yours