जळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जामनेर तालुक्यातील शेंगोळा यात्रा परिसरात असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज १ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीसह मौल्यवान साहित्य चोरून नेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
चोरट्यांनी मंदिरातील कळी-कोंडा तोडून आत प्रवेश करत दानपेटीतील रोकड, पितळी पादुका, पितळी पूजेचे साहित्य, साऊंड सिस्टीम तसेच कपाटातील चिल्लर असा अंदाजे ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सकाळी सुमारे नऊ वाजता बालकृष्ण पाटील हे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शेंगोळा गावाचे माजी सरपंच दिलीप रडाल यांना माहिती दिली. त्यानंतर जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून लवकरच चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून मंदिर परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
+ There are no comments
Add yours