शेंदुर्णी नगरपंचायत अध्यक्षपदावर कायदेशीर वाद!; उमेदवारी अर्जावर आक्षेप

जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत अध्यक्षपदावर कायदेशीर वाद निर्माण झाला असून नव निर्वाचित अध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर आक्षेप घेण्यात आला आहे. शेंदुर्णीतील जागृत नागरिक अजय विजय निकम यांनी यासंदर्भात थेट जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, गोविंद अग्रवाल यांनी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्र व माहितीपत्रकात काही बाबी लपवण्यात आल्याचा तसेच चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही बाब चौकशीत सिद्ध झाल्यास अध्यक्षपदाची निवड रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या तक्रारीमुळे शेंदुर्णीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. “कायदा सर्वांसाठी समान आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकरणाची चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या कथित लपवाछपवीबाबत शहरात संताप व्यक्त केला जात असून पुढील कायदेशीर प्रक्रियेवर शेंदुर्णी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र आहे. चौकशीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours