जळगाव येथे सरपंच संवाद – प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामस्तरीय नेतृत्व अधिक सक्षम करून शाश्वत व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या उद्देशाने “सरपंच संवाद – प्रशिक्षण कार्यक्रम व स्वच्छ संकल्प पुरस्कार – भारतीय गावांचे गुणवत्तापूर्ण गावांमध्ये रुपांतर कार्यक्रमाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले असता उपस्थित राहिले.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा हा राष्ट्रीय उपक्रम ग्रामपातळीवरील प्रशासन सुदृढ करणे, स्थानिक नेतृत्वाला बळकटी देणे व प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

कार्यक्रमात ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) प्रभावीपणे तयार करणे, स्थानिक शाश्वत विकास उद्दिष्टांशी संलग्न नियोजन, जलसुरक्षा, हवामान-संवेदनशील शेती, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, भूजल संवर्धन, उष्णता व्यवस्थापन तसेच डिजिटल साधनांच्या माध्यमातून पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कृषीप्रधान जळगाव जिल्ह्यातील हवामान बदल, अनियमित पर्जन्य व पाणीटंचाई यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संरचित नियोजन, संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन व सक्षम स्थानिक नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमात समवयीन-आधारित प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन यशस्वी गावांचे नेतृत्व करणाऱ्या ‘सरपंच मास्टर ट्रेनर’ द्वारे अनुभव व उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच कामगिरी-आधारित प्रोत्साहन यंत्रणा, डिजिटल मूल्यांकन प्रक्रिया व राष्ट्रीय स्तरावरील सरपंच संवाद व्यासपीठाद्वारे ग्रामपातळीवरील सुशासन बळकट करण्यावर भर देण्यात आला.

ग्रामस्तरावरील सक्षम नेतृत्वातून स्वच्छ, निरोगी व हवामान-संवेदनशील गावे घडविणे ही काळाची गरज असून ग्रामपातळीवरील प्रभावी सुशासनातूनच जिल्हा, राज्य व राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साध्य होईल, असे यावेळी नमूद केले.

याप्रसंगी जळगांव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मेंबर हिमांशू पटेल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनोजकुमार चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) भाऊसाहेब अकलाडे इ. उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours