चेन्नईत समुद्राच्या लाटांत जामनेरच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

इंटर्नशिपसाठी गेलेल्या जय पाटीलचा समुद्रात बुडून मृत्यू

जळगाव | जामनेर प्रतिनिधी

चेन्नई येथे समुद्रात वाहून गेलेल्या जामनेर तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जय नरेंद्र पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह काल सापडला. उत्तरीय तपासणीनंतर अ‍ॅम्ब्युलन्सने त्याचा पार्थिव पाळधी (ता. जामनेर) या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे. आज सायंकाळपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सुमारे सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स गावात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय पाटील हा अभियांत्रिकी पदवीधर असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी चेन्नई येथील कॉग्नीझंट कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारी सुटी असल्याने कंपनीतील काही तरुण समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि जयसह तीन जण पाण्यात ओढले गेले.

घटनेनंतर जयचा बराच वेळ शोध लागला नव्हता. रविवारीही त्याचा काही पत्ता लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अखेर काल त्याचा मृतदेह हाती लागला. शनिवारी सकाळी जयने पाळधी येथील घरी फोन करून मित्रांसोबत फिरायला जात असल्याची माहिती दिली होती; मात्र त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही नातेवाईक तत्काळ चेन्नईकडे रवाना झाले.

जय हा पाळधी येथील प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. त्याचे वडील शेतकरी असून आई शिक्षिका आहे. त्याच्या बहिणीचे बारावीचे पेपर सुरू असल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. मुख्यमंत्री यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून मदत व बचावकार्याची माहिती घेतली होती.

जयच्या अकाली निधनामुळे पाळधी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours