जामनेर : जामनेर तालुक्यातील भागदारा ग्रामपंचायतीत मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप होत असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे तर काही ठिकाणी अर्धवट कामे आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती योजना तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत गावात विविध विकासकामे मंजूर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. काही कामे पूर्ण न होता अर्धवटच सोडण्यात आल्याचेही समोर येत आहे. विशेष म्हणजे बंदिस्त गटारींच्या कामांना मंजुरी असतानाही गावातील अनेक ठिकाणी गटारी उघड्याच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याशिवाय काही शासकीय कागदपत्रांमध्येही अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत झालेला विकास हा प्रत्यक्षात भ्रष्टाचाराच्या उद्देशानेच झाला असल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.
सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज सुरू असताना या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावात झालेल्या विकासकामांची गुणवत्ता आणि निधीचा वापर याची जिल्हास्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे जिल्हा परिषद मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
+ There are no comments
Add yours