जामनेर शहरात आज “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेतून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान देशभर एकाच दिवशी आयोजित करण्यात आले होते.

सकाळी ७.४५ वाजता जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भाडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितू पाटील, नगरसेवक महेंद्र बावस्कर, आतिष झाल्टे, सुभाष पवार, पप्पू पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या अभियानासाठी २ मालवाहू रिक्षा, १२ ट्रॅक्टर तसेच नगरपालिका मार्फत २ ट्रॅक्टर व ३ घंटागाड्यांचे सहकार्य मिळाले. जामनेर परिसरातील १७ बैठकींमधून तब्बल ६९२ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत ७.६ टन ओला कचरा व ११.४ टन सुका कचरा असा एकूण १९ टन कचरा संकलित करून पहाडी बाबा येथील डंपिंग ग्राउंडमध्ये जमा करण्यात आला.
महास्वच्छता अभियानादरम्यान ११.३ किलोमीटर रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले तसेच सुमारे १ लाख ९९ हजार ८०० चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण शहर चकाचक झाले.
या उपक्रमासोबतच प्रतिष्ठानमार्फत वृक्षलागवड व संवर्धन, रक्तदान शिबिरे, विहीर पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप, व्यवसाय मार्गदर्शन, अंध व अपंगांसाठी साहित्य वाटप, बसथांबे निर्मिती व पाणपोई उभारणी असे विविध सामाजिक उपक्रम पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली.
समाजजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती व मानवताधर्माची शिकवण बैठकींच्या माध्यमातून दिली जात असल्याने या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
+ There are no comments
Add yours