रामेश्वर कॉलनीतील समस्यांवर तातडीने तोडगा काढा; अन्यथा अंत्ययात्रा आंदोलनाचा इशारा

आमदार सुरेश भोळे यांना दिले नागरिकांनी निवेदन

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विविध प्रलंबित समस्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, अन्यथा २३ मार्चपर्यंत तोडगा न निघाल्यास जिवंतपणी तिरडीवर झोपून अंत्ययात्रा काढत आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. याबाबत नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आमदार भोळे यांनी रामेश्वर कॉलनीतील काही मूलभूत समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या समस्या प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये एमआयडीसी भूखंड क्रमांक डी-४५/२ येथून कामगारांना रस्ता उपलब्ध करून देणे, मेहरूण स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, गट नंबर २५० मधील हनुमान मंदिराजवळील खुल्या जागेचे सुशोभीकरण करणे, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा राखीव करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे तसेच गट नंबर २४९ एमडीएस कॉलनीतील शिवदत्त मंदिराजवळील खुल्या जागेला संरक्षण भिंत उभारणे या मागण्यांचा समावेश आहे.

या सर्व विकासकामांबाबत आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा २३ मार्चपर्यंत निर्णय न झाल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours