जामनेर नगरपरिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 314.42 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सभेत मा. अध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. 16.07 लाख रुपयांची शिल्लक ठेवून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी दत्तात्रय जाधव व अंतर्गत लेखापरीक्षक प्रदीप गांगुर्डे यांनी अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भागवत भोंडे, गटनेते, सभापती व नगरसेवक उपस्थित होते. सर्वानुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 कोटी, प्रधानमंत्री आवास योजना 4 कोटी, पर्यटन विकास 10 कोटी, भुयारी गटार योजना 13 कोटी, अमृत योजना 20 कोटी, नागरी सेवा व सुविधा 20 कोटी यांसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण व आर्थिक दुर्बल घटकांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
सभेत ऋषिकेश एकनाथ माळी यांचा ‘Sunk Rock Ocean Swimathon 2026’ स्पर्धेत 5 किमी समुद्र पोहण्यात 23 वा क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
“माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत जामनेर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी केले.
+ There are no comments
Add yours