राज्यातील 9 लाख तर जळगाव जिल्ह्यातील 11 हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र!

राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू आहे. या योजनेत सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे केवळ दोन महिन्यांत तब्बल 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच जळगाव जिल्ह्यातील तब्बल ११ हजार १७५ महिला भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. तर  आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ नको म्हणून विभागाकडे अर्ज केले आहेत.

राज्यातील पात्र महिलांना ‌’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांप्रमाणे लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत आर्थिक उत्पन्न प्राप्तिकर तसेच बँक खात्याशी ई-केवायसी जोडणीनुसार पडताळणी होऊन अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच केली जात आहे. राज्य सरकारने महिला सक्षमीकरणांतर्गत १८ ते ६५ वर्षे वयोगटातील अविवाहित, विवाहित, परितक्त्या, विधवा, निराधार महिलांना आर्थिक सहाय्य स्वावलंबनासाठी ‌’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत दरमहा पंधरशे रूपये लाभ देण्याच्या योजनेला जून २०२४ मध्ये मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत नारीशक्ती ॲप ५ लाख ३४ हजार ७०५, ‌’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ पोर्टलद्वारे ५ लाख १० हजार १२१ असे १० लाख ४४ हजार ८२६ महिलांनी अर्ज केले होते. यात शासन स्तरावर पडताळणीअंती नारीशक्ती ॲपमधील २ हजार ५५२ तर ‌’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” पोर्टल ॲपमधील ८ हजार ६२३ असे ११ हजार १७५ महिला भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.

पात्रता निकष

‌’मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना लाभासाठी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजाराहून अधिक आहे, ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे, सरकारी नोकरी असणाऱ्या, दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील.याशिवाय दरवर्षी आधार प्रमाणीकरण, ई केवायसी, उत्पन्न प्राप्तिकर पडताळणी वेळोवेळी करण्यात येऊन अपात्र महिला लाभार्थी यातून वगळण्यात येऊन या नियम व अटी लागू असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ ४२ महिलांनी स्वत:हून नाकारला अहे. तसे अर्ज या महिलांनी महिला बालकल्याण विभागाकडे सादर केले आहेत. अशी माहिती जळगाव महिला बालकल्याण अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात देखील पडताळणी सुरू राहणार असून  आणखी अनेक लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे.त्यामुळे सरकार हळू हळू लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा आरोप देखील विरोधक करत आहेत.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours