कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने ठेकदारावर कारवाई होणार का?
जामनेर :
जामनेर शहरात जुनी पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली 3 ते 4 मजूर अडकले होते. त्यापैकी दोन मजूर मधोमध ढिगाऱ्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली . अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सात मजुरांपैकी दोन मजूर मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून इतर मजूर सुखरूप आणि सुरक्षित आहेत. ही घटना शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता घडली आहे.
अभिषेक विश्वकर्मा (रा. बोधवड उत्तर प्रदेश) आणि भोजू तवर (राहणार डोहरी तांडा जामनेर) अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,जामनेर पंचायत समितीची वाकी रोडवरील जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. 3 कोटी 80 लाख रुपयात इथे अद्यायाव्य सुविधांसह पशुवैद्यकीय दवाखाना शासनाकडून बनविण्यात येणार आहे. त्यामुळेच जुनी पंचायत समितीची ही इमारत पाडण्याचे काम गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू होते. आज सकाळी देखील सात मजूर ही इमारत पाडण्यासाठी काम करत होते. चार मजूर इमारतीच्या वरच्या मजल्यावर भिंत पाडण्याचे काम करत होते तर इतर तीन मजूर खालच्या मजल्यावर आपले काम करत होते. अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ढिकाऱ्याखाली दोन मजूर अडकले होते. मोठा आवाज झाल्याने घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिली. माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या वतीने दोघांना काढण्याचे काम सुरु झाले. तीन जेसीबी लावून मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिकाऱ्याखाली दबलेल्या एका मजुराला बाहेर काढण्यात यश आले. त्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यानंतर अजून एक मजूर आत मध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या मजुराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दुसरा मजूर हा ढिगाराच्या आत दबलेला होता. त्यामुळे पथक प्रयत्नानंतर त्याला देखील सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले असून इतर मजूर देखील किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व मजुरांना जामनेर येथील उपविभागीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगावच्या सिविल रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
घटनास्थळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर डी पाटील, कासकर यांच्यासह सर्व पोलीस स्टॉप सर्व नगरपालिका कर्मचारी, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जे के चव्हाण भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर , माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर ,गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावून मदत कार्य केले.

सुरक्षा उपकरणांचा अभाव……
इमारत पाडताना ठेकेदाराने या कामाची सर्व परवानगी घेतल्या होत्या का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इमारत पाडण्याचे काम सुरु असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नसल्यामुळे दोषी ठेकेदारावर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सखोल चौकशी करणार – तहसीलदार
दुर्दैवाने घडलेल्या या सर्व घटनेचा गंभीरित्या तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.
+ There are no comments
Add yours