जामनेर : तालुक्यातील पाळधी गावातील रहिवासी सुनिल भागवत पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे दिलेल्या अर्जावर कारवाई न झाल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. २६ जून २०२५ रोजी दिलेल्या अर्जाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांनी १५ ऑगस्ट रोजी लेखी स्वरूपात कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने सुनिल पाटील यांनी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता, “आमदार गिरीश महाजन यांनी अतिक्रमण काढण्यास नकार दिला आहे, त्यामुळे ग्रामपंचायत काही करू शकत नाही,” असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
यामुळे संतप्त होऊन सुनिल पाटील यांनी ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत जबाबदार म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी राहतील, असे त्यांनी लेखी निवेदनात नमूद केले आहे.
घटनेची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती बीडीओ आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आली असून गावात या प्रकरणामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
+ There are no comments
Add yours