जामनेर प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील रहिवासी प्रदीप कडू चांदणे (वय 45) यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे कुटुंबिय व ग्रामस्थांमध्ये मोठी संतापाची लाट पसरली आहे.
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, काल रात्री दोन जण प्रदीप चांदणे यांना सोबत घेऊन गेले होते. रात्री उशिरा सुमारे 11 वाजता ते दोघे पुन्हा विचारपूस करण्यासाठी आले, त्यानंतर रात्री 12 वाजता मोबाईल आणून दिला. परंतु सकाळी अचानक प्रदीप चांदणे मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे ही हत्या असल्याचा ठपका कुटुंबियांनी ठेवला आहे.
प्रदीप चांदणे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून, या घटनेत 4 संशयितांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाईला वेग देण्यात आला आहे.
जामनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले की, “ही घटना अपघात आहे की हत्या, याचा सखोल तपास सुरू आहे. चार संशयितांची ओळख पटली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
मयत प्रदीप चांदणे हे अनेक वर्षांपासून हिवरखेडा येथे स्थायिक होते. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. कुटुंब व गावकऱ्यांनुसार त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे हा मृत्यू नेमका अपघात की नियोजित कट यावर आता तपासाचे भवितव्य अवलंबून आहे.
या घटनेने हिवरखेडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
+ There are no comments
Add yours