जामनेरमध्ये खळबळजनक घटना : प्रकाशचंद जैन संस्थेचे राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू!

जामनेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेशी संबंधित असलेले राजकुमार कावडिया यांचा जळगाव येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन संस्थेवर प्रशासनाकडून कारवाई होणार होती. मात्र, त्याच्या अवघ्या 24 तास आधीच राजकुमार कावडिया यांचा मृत्यू झाल्याने या घटनेला नवीन वळण मिळाले आहे.

जळगाव पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, राजकुमार कावडिया यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, त्यांच्या नातेवाईकांनी यास विरोध करत सांगितले की, “त्यांना रात्रीपासून अस्वस्थपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.”

दोन्ही बाजूंच्या विधानांमुळे या मृत्यूभोवतीचे संशय अधिकच गडद झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

दरम्यान, जामनेर तालुक्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचा राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकुमार कावडिया हे समाजातील कार्यशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलीस तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours