जामनेर तालुक्यातील भागदरा गावात तरुणाची आत्महत्या —कर्जबाजारीपणा आणि घरगुती वादामुळे घेतले टोकाचे पाऊल
जामनेर : (प्रतिनिधी) — जामनेर तालुक्यातील भागदरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, ३५ वर्षीय प्रकाश नामदेव कांबळे या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रकाश कांबळे हा काही दिवसांपासून घरगुती वाद आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने काल रात्री कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले जाते. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण भागदरा गावात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, “कर्जाच्या ओझ्याने आणखी एक संसार उजाडला!” अशा शब्दांत ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.
दरम्यान, घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ग्रामीण भागात वाढती आर्थिक अडचण, शेतीवरील नुकसान, तसेच घरगुती कलह या कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.
“आर्थिक तणावातही उपाय आहेत, आत्महत्या नाही!” — अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहेत.
+ There are no comments
Add yours