जामनेर (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आचारसंहिता लागू झाल्यानंतरही नियमांचा भंग होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. जामनेर येथील शेतकी संघ परिसरात लावण्यात आलेल्या उद्घाटन फलकांवर पडदा न टाकल्याचे चित्र पाहायला मिळत असून, यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या कोणत्याही उद्घाटन फलकांवरील श्रेयनामावली झाकणे आवश्यक असते, मात्र जामनेर शेतकी संघातील फलक मात्र उघड्यावरच दिसत आहेत. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांचे खुले उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे. काहींचे म्हणणे आहे की, “आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित असताना, अशा प्रकारे फलक खुले ठेवले जाणे हे जाणूनबुजून दुर्लक्ष असल्यासारखे वाटते.”
विशेष म्हणजे, जामनेर शेतकी संघ हा भाजपच्या ताब्यात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या प्रकरणात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का, की राजकीय प्रभावामुळे प्रकरणावर पडदा टाकला जाणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे.
या संदर्भात जामनेर नगरपरिषदेचे सीईओ नितीन बागुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माहिती मिळाल्यानंतर तात्काळ नामफलक झाकण्यात येणार असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.”
दरम्यान, नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या हालचालींनंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे.
+ There are no comments
Add yours