बातमीची दखल : भागदरा दूषित पाणी प्रकरणाला झटपट प्रतिसाद


मुख्याधिकारी मीनल करनवाल यांच्या सूचनेनंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

जामनेर तालुका : भागदरा गावातील पाणीपुरवठ्यातून मृत पक्ष्यांचे सांगाडे व कचरा बाहेर येत असल्याच्या धक्कादायक घटनेची दखल प्रशासनाने तात्काळ घेतली आहे. जिल्हा परिषद मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी सकाळीच संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना थेट सूचना देत कारवाईला वेग देण्याचे आदेश दिले.

सूचनांनंतर काही तासांतच पाण्याची दूषित झालेली टाकी पूर्णपणे साफ करण्यात आली. वर्षानुवर्षे दुर्लक्षलेली स्वच्छता अखेर युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. टाकीची धुलाई, निर्जंतुकिकरण आणि सिस्टमची तपासणी करून पाणीपुरवठा सुरक्षित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने राबविली.

नवराष्ट्र Times News ला बातमी प्रकाशित होताच प्रशासन खळबळून जागे झाले. मुख्याधिकारी करनवाल यांनी “नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून कोणत्याही प्रकारची शिथिलता सहन केली जाणार नाही” असा स्पष्ट इशारा दिला आहे. याचबरोबर पुढे नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणीपुरवठा अखंडित सुरू ठेवावा, अशा कठोर सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत.

ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत केले असले तरी, “ही कारवाई तात्पुरती न राहता, कायमस्वरूपी नियमबद्ध व्हावी” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भागदरा प्रकरणाने दाखवून दिले की, लोकांच्या आवाजाला योग्य वेळी प्रतिसाद मिळाल्यास प्रशासनही तत्काळ हलते — आणि बदल त्वरित घडू शकतो.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours